Coronavirus : मुंबईतील खरा आकडा खूप जास्त ! आर्मीला बोलावणं, हा एकमेव पर्याय, भाजपाच्या ‘या’ आमदारांन सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. असे असताना मुंबई पोलीस प्रशासन , आरोग्य कर्मचारी कोरोनाला लढा देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील परिस्थिती गंभीर असून आर्मीला बोलावणं, हा एकमेव पर्याय राहिला आहे, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे.

मुंबईतील खरे आकडे खूप जास्त…

नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “काहीच बदललं नाही तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. खरे आकडे अजून सांगितले जात नाहीत. आता दाखवण्यात येणाऱ्या आकड्यांपासून खरे आकडे खूप जास्त आहेत. मुंबई महापालिकेत लवकरच नवे आयुक्त येणार ? आरोप-प्रत्यारोपांमध्ये लोकांचा जीव जाईल. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मीला बोलावणं, हा एकमेव पर्याय राहिला आहे,” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, एकीकडे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत लोकांना दिलासा देत आहेत. मात्र त्याचवेळी नितेश राणे यांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची नेमकी परिस्थिती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आकडे कोणतेही असो पुढील काही दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे असून मुंबईकरांना संयम ठेवून काळजी ही घ्यावीच लागणार आहे.