तब्बल 16 हजार कैद्यांना छळ करून ठार करणाऱ्या क्रूर ‘जेलर’चा मृत्यू !

नोमपेन्ह : वृत्तसंस्था – कंबोडियाचा हुकूमशहा खमेर रूजच्या कार्यकाळात तुरूंग अधिकारी असलेल्या कियांग गुयेक इआव याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कियांग 77 वर्षांचे होते. कियांग तुरूंग अधिकारी असताना त्यानं ज्यांनी सत्तेविरोधात आंदोलनं केली अशा 16 हजार कंबोडियन नागरिकांचा तुरुंगात छळ त्यांना ठार केलं होतं. कियागच्या या कामामुळं त्याला युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. याशिवाय त्याला डच या नावानंही ओळखलं जातं होतं.

युद्ध अपराध आणि मानवतेविरोधातील गुन्ह्यांसाठी कियांगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. खमेर रूजच्या सत्ता काळात झालेल्या गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्याय प्राधिकरणाच्या प्रवक्त्या नेथ फियकत्रा यांनी सांगितलं की, कियांगचा मृत्यू बुधवारी सकाळी कंबोडियाच्या एका रुग्णालयात झाला. 2013 साली न्याय प्राधिकरणानं त्याला कंदाल प्रांतीय तुरुंगात स्थलांतरीत केलं होतं.

तुरुंग प्रमुख चैत सिनयांग म्हणाले, कियांगला श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यामुळं त्याला सोमवारी कंबोडियन सोव्हिएत फ्रेंडशिप रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्र संघाचा पाठिंबा असलेल्या न्याय प्राधिकरणानं 2009 मध्ये झालेल्या सुनावणीत कियांगला शिक्षा ठोठावली होती. कियांग हा शिक्षा झालेला खमेर रूजच्या सत्ता काळातील पहिला अधिकारी होता. 1970 च्या दशकात खमेर रूजचा सत्ताकाळ हा सर्वात क्रूर कार्यकाळ मानला जातो. त्याच्या सत्ताकाळात 17 लाख जणांचा मृत्यू झाला होता. ही संख्या त्या वेळच्या कंबोडियाच्या लोकसंख्येच्या 25 टक्के एवढी होती.