उपचारासाठी आलेल्या कैद्याने रुग्णालयातून ठोकली धूम, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील प्रकार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   मायलेकीवर अतिप्रसंग करण्याच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पोलिसांची नजर चुकवून घाटी रुग्णालयातून धूम ठोकली. शनिवारी (दि. 5) सकाळी 8.40 वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

किशोर विलास आव्हाड (23, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मार्च 2019 मध्ये शहानूरमिया दर्गा येथील आठवडी बाजार आटोपून मायलेकी घरी जाण्यासाठी रात्री 7 वाजता रिक्षाची प्रतीक्षा करीत थांबल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांना घरी नेऊन सोडण्याची बतावणी करून स्वतःच्या दुचाकीवर बसविले आणि तो त्यांना राजनगर येथील नाल्याकडे घेऊन गेला होता. तेथे मायलेकींवर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मात्र, त्या दोघींनी असाध्य रोग असल्याचे त्याला खोटे सांगून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली होती.

या प्रकरणी त्याला अपहरण, विनयभंग आणि पोस्को (बाललैंगिक अत्याचार) आदी गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याला जानेवारी महिन्यात 5 वर्षे सक्तमजुरी आणि दंडाचीची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये होता. दरम्यान, आजारी असल्याची तक्रार त्याने जेलरकडे केल्याने त्याला गुरुवारी (दि. 3 ) सकाळी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्याजवळ जेलचे पोलीस कर्मचारी तैनात होते. आज सकाळी 8.40 वाजता वॉर्ड क्रमांक 18 मध्ये तो खाटेवर झोपलेला होता. तेव्हा त्याच्यापासून काही अंतरावर जेलरक्षक मोबाईलवर बोलत उभे होते. त्यांची नजर चुकवून त्याने वॉर्डातून धूम ठोकली. ही बाब समजताच एसीपी हनुमंत भापकर, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, सपोनि अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यांनी घाटीत धाव घेत माहिती घेतली. तसेच त्याचा शोध सुरू केला आहे.