ट्रिपल केसरी आणि सहायक पोलीस आयुक्त (ACP) नरसिंह यादव विरुद्ध गुन्हा

उमेदवाराचा प्रचार कणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कुस्तीपटू नरसिंग यादवविरोधात गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलात एलए -५ मध्ये सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर कार्यरत असणाऱे नरसिंह यादव यांच्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांसोबत आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नरसिंह यादव अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राधेश्याम काळुराम शर्मा यांनी अंबोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नरसिंह यादव यांनी नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला सुवर्णपद मिळवून दिले होते. सध्या ते मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस दलात कार्यरत असून देखील नरसिंह यादव यांनी उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करत असल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार लोकप्रिय अभिनेता, अभिनेत्री किंवा खेळाडूंच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेताना दिसत आहेत. मात्र, काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहिल्याने कुस्तीपटू आणि एसीपी नरसिंह यादव अडचणीत आले आहेत.

सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्यांची नियुक्ती थेट पोलीस उपअधिक्षकपदी करण्यात आली होती. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असताना देखील नरसिंह यादव यांनी निरुपम यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. तसेच सरकारी अधिकारी असलेले यादव हे काँग्रेस उमेदवार निरुपम यांच्याबरोबर स्टेजवर प्रचार करत असल्याची बाबा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या लक्षात आली. त्यानुसार खात्रीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निरुपम यांच्या सभेदरम्यान काढण्यात आलेले चित्रीकरण तपासले. यामध्ये यादव हे निरुपम यांचा सोबत प्रचाराच्या स्टेजवर उपस्थित असल्याचे दिसून आले.

यानंतर नरसिंह यादव यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात ‘रिप्रेझेंन्टेटीव्ह ऑफ पोलीस कायदा’ कलम १२९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे लवकरच यादव यांना पोलीस दलातील विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.
https://twitter.com/sanjaynirupam/status/1120027039292018688