Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याला ताजमहालावरून फटकारले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘ताजमहाल’ या राष्ट्रीय वास्तूवर प्रदूषणाचा वाईट परिणाम होत असून त्याच्या रंगही बदलत आहे. मात्र, तरीही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून त्यावर विशेष लक्ष दिले जात नसल्याचे,’ सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व खात्याला आज खडे बोल सुनावले.

या प्रकरणी पुरातत्व खात्याने शेवाळ आणि किटकांमुळे हा परिणाम होत असल्याचे न्यायालयात सांगितले. यामुळे ताजमहालचे नुकसान कसे होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला. असे असल्यास ताजमहालला त्यापासून मुक्ती द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ताजमहालच्या रंगाबाबत सर्व प्रथम १९९६ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर २२ वर्षे झाले तरी यावर काहीही अंमलबजावणी झाली नसून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुरातत्व खात्याच्या त्या उत्तरावरून या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याची टिप्पणीही केली.

सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हणाले आहे की,” शेवाळ्याला काही पंख आहेत का? की ते उडून ताजमहालवर जाऊन बसेल. जर पुरातत्व विभागाची हीच भुमिका असेल तर केंद्र सरकारला ताजमहालच्या देखभालीसाठी पर्याय शोधावा लागेल.”

पुरातत्व खात्याने स्पष्टीकरण देताना सांगितले की,”पर्यटक बऱ्याचदा पायमोजे वापरतात. हे मोजे अस्वच्छ असतात. त्यामुळे फरशी खराब होत आहे. परदेशात विविध ठिकाणी तात्पुरते मोजे दिले जातात.” तर याचिकाकर्ते एम. सी. मेहता यांनी सांगितले की,”यमुना नदीत पाणी खराब आहे. पहिल्यांदा या पाण्यात मासे होते, जे शेवाळ खात होते.” या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये असून त्यावर केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर देणे अपेक्षित आहे.