आधार कार्डचा नंबर माहिती झाल्यास बँक अकाऊंट हॅक होऊ शकतं का ?, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन – ५०० रुपये दिल्यास देशातील अब्जावधी नागरिकांच्या आधार कार्डची गोपनीय माहिती मिळते. तर अधिकचे ३०० रुपये दिल्यास उपलब्ध माहितीची प्रिंटही काढून मिळते, अशा आधार कार्डबाबतच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी अनेकांना धडकी भरली होती. तसेच आजही आधार नंबर जर लीक झाला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, त्यावरती आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
आधार नंबर इतरांना माहित झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते का ?
यूआयडीएआयने सांगितल्यानुसार, जसे तुमच्या एटीएम कार्डचा नंबर माहिती असेल तर कोणालाही एटीएम मधून पैसे काढता येत नाही, तसेच नुसते आधार नंबर माहिती असल्यानंतर कोणालाही तुमचे बँक अकाउंट हॅक करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही पीन/ओटीपी एखाद्या व्यक्तीस/हॅकरला शेअर करत नाही, तोपर्यंत बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही.
इतर व्यवहारांना आधार लिंक असेल तर ?
म्युच्युअल फंड, शेअरसाठीचे डिमॅट अकाउंट किंवा मोबाइल कनेक्शनसाठी आधार नंबर दिलेला असतो. मात्र, त्यामुळे त्याचा कोणत्याही बँक अकाउंटवर परिणाम होत नाही. तुमचा आधार कार्ड नंबर जर एखाद्या व्यक्तीस मिळाला किंवा आधीच माहिती असेल तर तुमच्या बँक अकाउंटला काहीही होणार नाही, असा दावा यूआयडीएआयने केला आहे. तसेच आधार कार्डचा नंबर इतर कोणालाही माहिती असेल तर त्याचे आर्थिक नुकसान झाल्याची कोणतीही घटना आजवर उघडकीस आली नसल्याचं UIDAI च्या वतीने सांगण्यात आले.