कोविड व्हॅक्सीनने नपुंसक होण्याचा धोका आहे ? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : देशात दिड लाखापेक्षा जास्त लोकांचा जीव घेणार्‍या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सुरू होत आहे. परंतु, या दरम्यान कोरोना व्हॅक्सीनबाबत (covid 19 vaccine ) विविध प्रकारच्या शंका, गैरसमज आणि अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. अनेक प्रकारच्या साइड इफेक्ट्सचा दावा केला जात असल्याने लोकांच्या मनात द्विधावस्था निर्माण होत आहे. दरम्यान, देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्वताहून या अफवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना लसीच्या (covid 19 vaccine ) साइड इफेक्ट्सबाबत काही लोक हा सुद्धा दावा करत आहेत की, ही लस नपुंसक बनवू शकते.

मागील काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून दावा करण्यात आल्यानंतर हा गैरसमज वेगाने पसरला. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत म्हटले की, कोणताही शास्त्रीय पुरावा असा नाही की, जो सांगू शकतो की कोविड व्हॅक्सीनमुळे महिला किंवा पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. कृपया अशाप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका.

 

 

 

 

 

 

कोरोना लसीमुळे कशाप्रकारचे साइड इफेक्ट्स?
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरणामुळे होणार्‍या साइड इफेक्ट्सची माहिती देताना म्हटले, कोविड-19 व्हॅक्सीन दिल्यानंतर काही लोकांना हलका ताप, लसीच्या ठिकाणी वेदना, शरीरात वेदना अशा तक्रारी असू शकतात. हे साइड इफेक्ट्स इतर लसींसारखे आहेत. हा त्रास काही वेळातच दूर होण्याची अपेक्षा आहे.

व्हॅक्सीनमुळे कोरोना होऊ शकतो का?
या गैरसमज दूर करताना आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, कोविड-19 व्हॅक्सीन घेतल्याने तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकत नाही. जर लस घेतल्यानंतर काही काळासाठी हलका ताप आला तर यास कोविड समजू नये.