कॅनडामध्ये चीनविरोधात निदर्शने ! आम्ही भारताबरोबर असल्याचं तिबेटी युवा काँग्रेसनं सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कॅनडाची राजधानी टोरोंटो येथे चिनी वाणिज्य दूतावासाबाहेर चीनविरूद्ध निदर्शने केली जात आहेत. प्रादेशिक तिबेट यूथ कॉंग्रेसच्यावतीने चीनविरूद्ध तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. यावेळी ‘तिबेट स्टॅण्ड विथ इंडिया’ अशी घोषणाबाजी केली जात आहे. त्याचबरोबर ‘थँक यू इंडियन आर्मी’ अशी घोषवाक्यही देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे प्रादेशिक तिबेट युवा कॉंग्रेसच्या समर्थकांनी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात निषेध केला आणि लोकांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. यापूर्वीही भारत आणि चीनमधील हिंसाचारानंतर तिबेटी समुदायाच्या लोंकांनी भारताच्या शहीद सैनिकांबाबत शोक व्यक्त केला होता.

तिबेटवर चीनचा कब्जा
तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख लोबसांग सांगये यांनी सोमवारी सांगितले की, चीनसोबतच्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारतानेही तिबेटचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. फॉरेन कॉरस्पोंडेंसी क्लबच्या वतीने आयोजित वेबिनारला संबोधित करताना सांगय म्हणाले की, तिबेट हा देखील भारत आणि चीनमधील तणावाचा मुद्दा आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीन दरम्यान तिबेट बफर झोन म्हणून काम करायचा, पण चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतर मुद्दा संपला.

केंद्रीय तिबेट प्रशासन (सीटीए) अध्यक्ष म्हणाले की, चीनने पंचशील कराराच्या रूपात विश्वासघाताचे बीज पेरले होते. चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतर भारताला मोठी किंमत मोजावी लागली. ते म्हणाले, ‘भारताने असे म्हटले पाहिजे की, तिबेट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिबेटच्या समस्येचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावायला हवी.