राफेल संबंधी सर्व याचिका रद्द करा, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल प्रकरणासंबंधी केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात लिखित निवेदन दाखल केलं आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारने सांगितले की राफेल कराराच्या तपासासंबंधी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका रद्द केल्या पाहिजेत.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी राफेल कराराला एक मोठा मुद्दा बनवला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या करारात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवले होते. राफेल प्रकरणाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ असे सातत्याने म्हंटले होते. असे आरोप होत असताना देखील भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन दाखल करून याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे. यामध्ये राफेल प्रकरणातील याचिका या खोट्या व बनावट आरोपांवर आधारित आहेत असे म्हंटले आहे. या लिखित निवेदनात सरकारने म्हंटले की, संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यालयापासून कोणतीही माहिती लपविली नाही. राफेल करारात पंतप्रधान कार्यालयाकडून कसलीही समांतर चर्चा झालेली नाही. या संबंधी दाखल झालेल्या याचिका चोरी झालेल्या फायलीमधील माहितीच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे, ज्याची चुकीच्या व्याख्या करण्यात आली आहे.