‘बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करा’, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याची मागणी

पोलिसनामा ऑनलाइन – दक्षिण-पूर्व इंग्लंड आणि लंडनमध्ये कोरोनाचं हे नवं रूप मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये समोर आलेला नव्या प्रकारचा कोरोना हा आधीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक वेगानं पसरतो. काही दिवसांपूर्वीच आढळलेल्या या विषाणूमुळं बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक राष्ट्रांनी हा नवीन प्रकार समोर आल्यानंतर उड्डाणांवर आणि विमान प्रवासांवर निर्बंध आणल्याचं दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी याच पार्श्वभूमीवर केंद्राकडे मोठी मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, इग्लंडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं खुद्द तिथल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. अशात कोणतीही हयगय न करता तिथल्या विमानांवर बंदी घालावी. तसंच बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना प्रजासत्ताक दिनी जे आमंत्रण दिलं आहे ते पण रद्द करावं अशी मागणी चव्हाणांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बोरिस जॉन्सन यांचं आपण योग्यवेळी स्वागत करूच. परंतु आरोग्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं तडजोड करता कामा नये. अशाच पद्धतीची तडजोड डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दौऱ्यात झाली. त्यावेळी सरकारनं लॉकडाऊन घोषित करण्यात दिरंगाई केली. महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला

चव्हाण असंही म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास विषाणूचा प्रादुर्भाव वाढला तर बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. भारतातील जनतेचा जीव वाचवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय औपचारिकतेवर अवलंबून न राहता आरोग्य खात्यानं व परराष्ट्र मंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असंही त्यांनी सांगितलं आहे.