Cororonavirus : अजित पवारांचे केंद्राला पत्र, ‘कोरोना’संदर्भात महत्त्वाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेल 3 प्लाय मास्क, एन 95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स, टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर्स तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवा करातून (GST) सूट देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच हा निर्णय त्वरीत घेतल्यास मास्क, किट्स, व्हेंटिलेटर्स बाजारात सहज व स्वस्त उपलब्ध होण्यास मदत होईल आणि त्यातून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात ही संख्या नियंत्रणात रहावी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. संचारबंदी, लॉकडाऊन करून नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना बाधित आणि संशयित रुग्णाचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. प्रत्येकावर स्वतंत्रपणे उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रस, ट्रॅक, टेस्ट अ‍ॅन्ड ट्रीट या मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्रात पूर्ण शक्तीनिशी सुरु असल्याची ग्वाही त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिली आहे.

कोरोनाच्या लढ्यात योगदान देत असलेले डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था उद्योग जगताकडून आलेल्या सूचनांवर राज्य शासन तत्परतेने कार्यवाही करत असून,3 प्लाय मास्क, एन 95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिवह इक्विपमेंट किट्स, टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर्स तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवाकरातून सूट देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या वस्तूंवरील जीएसटी माफ करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.