पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील ‘ती’ नियोजित सभा रद्द करा ; काॅंग्रेसची मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मतदानाच्या ४८ तास आधी कोणालाही प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदारसंघाच्या १०० किमी परिसरात सभा अथवा कोणताही प्रचार करता येत नसल्याने १७ एप्रिल रोजी अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्याची मागणी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अकलूज येथे जोरदार तयारी सुरु आहे. रणजितसिंह मोहिते हे भाजपमध्ये गेल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकलूज येथे येत आहे. या सभेत मोठे शक्तीप्रदर्शन करुन आपली ताकद दाखविण्याचा मोहिते यांचा विचार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

मात्र, आता काँग्रेसच्या तक्रारीनंतर त्यात एक तांत्रिक अडचण येऊ घातली आहे. सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले की, सोलापूर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. म्हाडा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघातील प्रचार हा १६ एप्रिल रोजी सायंकाळी समाप्त होणार आहे. सोलापूर आणि मोंदींच्या सभेचे स्थान असलेले अकलूजमध्ये १०० किमीपेक्षा कमी अंतर असल्याने नियमाप्रमाणे मतदानाच्या २४ तास आधी कोणतीच सभा घेता येत नाही. त्यामुळे अकलूजमधील मोदी यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी तक्रार प्रकाश पाटील यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे. मात्र, आयोगाने या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही. आपण याबाबत पाठपुरावा करत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.