मराठा आरक्षण रद्द करा ; एमआयएम आमदाराची हायकोर्टात याचिका 

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करा अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यसरकारने मराठा समाजाला १६ % आरक्षण दिले आहे. दरम्यान राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा याबाबतच्या अहवालाला आव्हान देत मराठा आरक्षण रद्द करा या मागणीची याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. इतकेच नव्हे तर याच याचिकेत मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करा अशी मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना राज्यसरकार कडून तो डावलला जात आहे असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यामुळेच मुस्लिम समाजाचे आणि यांतील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावे अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांनी सतिश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात सादर केली असून, या याचिकेवर मुख्य याचिकेसोबत येत्या २३ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.