महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करा : कर्तव्य फाउंडेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महावितरणच्या वाडीया उपविभाग कार्यालयाचे हडपसर येथील प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महावितरण कंपनीचे वाडीया कॉलेजजवळ असलेले वाडीया उपविभागीय कार्यालय हडपसर औद्योगिक वसाहत येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. महावितरणकडील कामकाजाकरीता नागरिकांना हडपसर येथे जाण्याचा त्रास सहन करावा लागेल. यात नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. त्यामुळे या कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर रद्द करण्यात यावे अशी मागणी कर्तव्य फाउंडेशनने केली. यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) बा.भा.हळनोर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, माजी नगरसेवक शैलेंद्र बिडकर, अशोक देशमुख, सचिन कांबळे, गणेश शेलार, सुनील बाथम उपस्थित होते.

सध्याच्या वाडीया उपविभागात बोट क्लब रोड, कोरेगाव पार्क व जे.जे.गार्डन हे तीन सेक्शन येतात. त्याअंतर्गत पुणे स्टेशन, पुणे कँम्प परिसर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, बोट क्लब रोड, बंडगार्डन, वाडिया काँलेज, जीपीओ, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे पोलीस आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग, क्वीन्स गार्डन, गवळीवाडा, भिमपुरा आदी परिसराचा समावेश होतो. त्यात सोसायटी, वस्ती ,झोपडपट्टी सोबतच बहुतांश सरकारी कार्यालये व निवासस्थान आहेत. या भागात महावितरणचे ४० हजार हून अधिक ग्राहक आहेत.

या ग्राहकांना नवीन वीजजोड, वीज बील दुरूस्ती, वीज तक्रार, वीज बिल भरणा, मीटर दुरुस्ती आदी कामांसाठी मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या वाडीया उपविभागीय कार्यालयात यावे लागते. या स्थलांतरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल अशी चिंता निवेदनात व्यक्त केली आहे. कार्यकारी अभियंता हळनोर यांनी याबाबतीत नागरि हिताचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष भांबुरे यांनी सांगितले.