Solapur News : मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू, गावातील निवडणूक रद्द

सोलापूर (solapur) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज (शुक्रवार) सकाळी सुरुवात झाली. मतदानाची वेळ संपण्यास काही वेळ शिल्लक राहिला आहे. सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने गावातील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अक्कोलकोट तालुक्यातील खैराट गावातील उमेदवाराचा नैसर्गिक मृत्यू झाला.

सायबण्णा बिराजदार असे मृत्यू झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. आज मतदानाच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास बिराजदार यांचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. बिराजदार उमेदवार असलेल्या संबंधित वॉर्डाची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिराजदार ज्या वॉर्डातून निवडणूक लढवत होते. त्या वॉर्डातील मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान, राज्यात आज सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदारांमध्ये उत्साह कमी होता. मतदानाची वेळ संपत आली असताना उमेदवारांची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळत आहे. उमेदवार मतदारांना मतदान करण्याचे आवहान करत आहे. दुपार नंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे पहायला मिळाले. राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.