पुणे : उमेदवार ठरला नाही तरी काँग्रेसला प्रचाराची झाली घाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उद्या रविवारच्या मुहूर्तावर ४. १५ मिनिटाने कसबा गणपतीच्या मंदिरात नारळ फोडून काँग्रेस पुण्याच्या जागेचा प्रचार सुरु करणार आहे. पुण्याचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रचार सुरु करण्याची लगबग काँग्रेस का करत आहे, असा सवाल सुज्ञ पुणेकर विचारू लागले आहेत. तर आज मध्यरात्रीपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा घाट घातला आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने पुण्याचा उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब लावला असल्याने भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात येते आहे. तसेच सामान्य मतदार देखील सोशल मीडियात काँग्रेसला ट्रॉल करू लागले आहेत. पुण्यात भुयार सापडले मात्र, काँग्रेसला उमेदवार सापडेना अशा आशयाचा एक मॅसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. याची काँग्रेसने देखील गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवाराच्या घोषणेसाठी हालचाली वाढवल्या आहेत.

पुण्याच्या जागी सध्या काँग्रेसकडून मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काॅंग्रसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेण्यात आला आहे.