माढ्यातील तिढा गृहकलहातून काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत देखील सकारात्मकता व्यक्त केली. पार्थ पवारांचे तर नाव आले पण रोहित पवारांचं काय अशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा पवारांचा निर्णय हा गृहकलहातून घेतला गेला असावा अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

पवार यांच्या माघार घेण्यामागे माढ्यातील स्थानिक नेत्यांमध्ये असलेले मतभेद याबरोबरच कौटुंबिक संघर्ष हे देखील कारण असल्याची चर्चा आहे. एका कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी, याला मर्यादा असतात. त्यामुळे अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि सुप्रिया सुळे यावेळी रिंगणात उतरणार असल्याने आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे पवार यांनी सांगितले असले, तरी पवार यांच्या दोन नातवांमधील सत्तासंघर्षामुळेच पवारांना हे पाऊल उचलावे लागले असावे, थोडक्यात माढ्यातील तिढा हा गृहकलहातून झाला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद
लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर राजकारणातील वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कौटुंबिक चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सांगितलं असताना आता पवार कुटुंबातूनच त्यांना निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. शरद पवारांचे दुसरे नातू व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात “माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा” असं म्हंटल आहे.

कौटुंबिक मतभेद
शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे. रोहित हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. भविष्यात ते पवारांचा वारसा चालविणार असल्याची चर्चा होती. यामुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अस्वस्थ झाले होते. त्यातच पार्थ यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी बांधणी केली होती. हे सुरू असतानाच पवार यांनी अचानक माढ्यातून आपली स्वत:ची उमेदवारी जाहीर केली.

आपली उमेदवारी जाहीर करतानाच, या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार असतील, असे त्यांनी सांगितले होते साहजिकच, पार्थ पवार यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती. पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबीयातील तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. पवार यांनी माघार घेतल्यामुळे आता पार्थ पवार यांची मावळलोकसभा मतदारसंघातील वाट मोकळी झाली आहे.