‘या’ शिक्षक मतदार संघातील उमेदवाराची चक्क बनियनवरच झाली एन्ट्री अन्…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन –   अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील एका उमेदवाराने मंगळवारी (दि. 1) चक्क बनियनवरच मतदान केंद्रावर प्रवेश करून खळबळ उडवून दिली. नेर येथील तहसील कार्यालय मतदान केंद्रावर पोहोचलेल्या या शिक्षक उमेदवाराने विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना मांडण्यासाठी अशा भूमिकेत आल्याचे सांगितले.

उल्हास पाटील (रा.कारली, ता.मानोरा, जि.वाशिम) असे या उमेदवाराचे नाव आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते स्वतः रिंगणात आहे. मंगळवारी मतदान सुरू असताना उल्हास पाटील हे मतदान केंद्राचे परिक्षण करण्यासाठी तहसील कार्यालयातील केंद्रावर धडकले. फुलपँट आणि बनियनवर धडकलेल्या या उमेदवाराला पाहून प्रशासनाची धावपळ सुरू झाली, तर बघ्यांची गर्दी जमली. शासनाचा निषेध करण्यासाठी आज मतदानाच्या दिवशी बनियनवर राहुनच आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे उल्हास पाटील म्हणाले.

17 वर्ष वेतनापासून वंचित

कार्ली येथील विनाअनुदानित विद्यालयात कार्यरत असताना गेल्या 17 वर्षांपासून पगार मिळाला नाही. गेल्या 4 वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न शासनाकडे मांडत गेलो. मात्र केवळ आश्वासने मिळाली. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. पण शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी या भूमिकेत मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी आल्याचे उल्हास पाटील म्हणाले.