Gram Panchayat Elections : उमेदवारांना सादर करावी लागणार जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करावे लागणार आहे. पोचपावती व हमीपत्र घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले आहेत.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 11 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार तसे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिले आहेत.