Mumbai : काय सांगता ! होय, चक्क उच्चशिक्षित तरुणांकडून घरातच गांजाची शेती

मुंबई, ता. १७ : पोलीसनामा ऑनलाइन : डोंबिवलीच्या पलावा सिटीत राहणारे उच्चशिक्षित तरुण घरातच जमीनविरहीत हायड्रोपोनिक गांजाची शेती करत होते. इमारतीतील २ बीएचके फ्लॅटमध्ये ही शेती सुरु होती. गांजाची शेती करणाऱ्या दुकलीला एनसीबीने अटक केली आहे. डार्कवेबद्वारे अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलॅण्ड येथून बियाणे विकत घेण्यात येत होते. या अटक केलेल्या दुकलीकडून १ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला तसेच त्यांचा फ्लॅटही सील करण्यात आला आहे.

अमली पदार्थविराेधी पथकाने (एनसीबी) दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून जावेद जहांगीर शेख आणि अर्शद खत्री या संशयितांची माहिती मिळाली. दोघांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत, डोंबिवलीतील पलावा सिटीमधील टू बीएचके फ्लॅटमध्ये ते हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. घरातून जमीनविरहीत शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, पीएच रेग्युलेटर, पाण्याचे पंप, कार्बन वायूचे सिलिंडर, अद्ययावत प्रकाश योजना, हवा खेळती ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आदी यंत्रणा सापडली.

रेहान खानच्या मालकीचा हा फ्लॅटआहे. तो सौदी अरेबियाला राहताे. त्याने या शेतीसाठी अर्शदला फंडिंग केल्याची माहिती समोर आली आहे. अर्शद हा हायड्रोपोनिक लागवडीतील तज्ज्ञ आहे. अर्शदला एक ग्रॅम गांजा उत्पादित करण्यासाठी अडीज हजार रुपये खर्च येत होता तर बाजारात त्याची आठ हजार रुपयांना विक्री व्हायची. त्याने आतापर्यंत अशी ४ पिके घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हायप्रोफाईल लोकांमध्ये याची जास्त मागणी आहे. एनसीबीचे पथक सध्या त्यांच्या मुंबईतील नेटवर्कचा शोध घेत आहे. तसेच याच प्रकरणात अन्य आराेपी साहिल फ्लॉकोचाही शोध सुरू आहे.

हायड्रोपोनिक गांजाची खरेदी-विक्री बिटकॉइन्सद्वारे करण्यात येत होती. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया ॲप्सचा आधार घेण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या कारवाईत एनसीबीने मूळचा आफ्रिकन वंशाचा नागरिक ओनुरह सॅम्युएल माईक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३० ग्रॅम कोकेन जप्त केले. माईक हे कोकेन मुंबईच्या अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ भागात विकत असे.