हिंगोली : औंढा, वसमतपाठोपाठ सेनगाव तालुक्यात गांजाची लागवड

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – औंढा, वसमतपाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातही शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे. वरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली असून पोलिसांनी 87 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून गांजाची लागवड हळदीच्या पिकात केल्याचे आढळून आले.

सेनगाव तालुक्यातील वरखेडा शेत शिवारात गट क्रमांक 271 चे शेतमालक दगडू लक्ष्मण पघडन यांचा मुलगा मिलींद घडघन (वय-40) याने आपल्या शेतातील हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली होती. त्याने एकूण 36 लहान मोठी झाडे अवैधरित्या लागवड केल्याचे आढळून आले आहे. या झाडांचे एकूण वजन साडेसतरा किलो असून याची किंमत 87 हजार 500 रुपये एवढी आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, ज्ञानेश्वर सावळे, चालक संदीप खरबळ यांच्या पथकाने केली.

आठ दिवसात तिसरी कारवाई

मागील आठ दिवसांमध्ये पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे. पोलिसांनी तिसरा छापा टाकून गांजा जप्त केला आहे. पहिल्या दिवशी औंढा तालुक्यातील तीन, तर वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजा आढळला होता. औंढा तालुक्यात होमगार्डनेच गांजाची शेती केल्याचे समोर आले होते. सेनगाव तालुक्यात देखील पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला आहे.