ही काही ट्वेंटी-20 क्रिकेट नाही, कोहलीच्या नेतृत्वावर गंभीरने केली टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलनंतर पहिल्यांदाच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय, टी-ट्वेंटी सामने होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या दोन एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. एक नाही तर दोन्ही सामन्यांत भारताला अपयश आल्याने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एक क्रीडा वृत्तवाहिनीच्या मॅच शोमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

अत्यंत चांगली फलंदाजी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला गोलंदाजीने धक्के देत राहणे म्हणजे जास्तीत जास्त विकेट घेणे गरजेचे होते. हे आपण वारंवार बोलत आहोत. पण, तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजाकडून दोन षटकांची स्पेल करून घेता. वन डे क्रिकेटमध्ये साधारणता ४-३-३अशा तीन स्पेल टाकल्या जातात, परंतु प्रमुख गोलंदाजाला दोन षटकानंतर थांबवले जाते. विराट कोहलीचे निर्णय मला कळलेच नाहीत. ही काही ट्वेंटी-20 क्रिकेट नाही. खराब नेतृत्वामागचं मी कारणही समजावून सांगू शकत नाही, अशा शब्दांत गंभीरने विराटवर टीका केली.

सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानंही हाच मुद्दा मांडला. भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवत आहे, याच मुद्यावर गंभीरनं काही नावं सुचवली वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे किंवा अन्य कोणता तरी पर्याय ठेवायला हवा होता. पण, यापैकी एकही पर्याय न ठेवणे, ही निवड प्रक्रियेची चूक आहे. कोणत्याही खेळाडूची कामगिरी तपासण्यासाठी त्याला संधी देणं गरजेचं असतं. मात्र, त्याला संधी दिली नाही तर तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. भारतीय संघाने तसे काहीच केले नाही. त्याचा फटकाही संघाला बसला, असेही गंभीरने सांगितले.

भारताविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनदिवसीय मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला आहे. पहिल्या वन डे सामन्यात ६६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाकडून दमदार कमबॅकची अपेक्षा फोल ठरली. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या वन डेत ५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. स्टीव्हन स्मिथची ( १०४) शतकी खेळी अन् फिंच ( ६०), वॉर्नर ( ८३), मार्नस लाबुशेन ( ७०) व ग्लेन मॅक्सवेलच्या ( ६) अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभा केला. भारताविरुद्धची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात टीम इंडियाला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. विराट कोहली ( ८९) आणि लोकेश राहुल ( ७६) यांच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे नेतृत्त्वावर टीका करण्यात येत आहे. दोन सामने हताश गेले आहेत. मात्र, उरलेल्या एका सामन्यात भारतीय संघाची कामगिरी काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.