ताम्हिणी घाटात मोटार झाडाला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील रहिवाशांचा समावेश आहे. दोघा जखमींना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल रात्री दोनच्या सुमारास पुणे-माणगाव महामार्गावर ताम्हिणी घाटातील कोंडेसर गावानजीक घडला.

निखिल गुळे, चंद्रकांत निकम, विक्रम सिंग अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमीमध्ये विजय पाटील, सुनील टेलंगे यांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निखिल, चंद्रकांत आणि विक्रम इतर दोन मित्रासोबत मोटारीतून दिवे आगारच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ताम्हिणी घाटात कोंडेसर गावाजवळ एका झाडाला धडकली. त्यामुळे निखिल, चंद्रकांत, आणि विक्रम यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय आणि सुनील गंभीररीत्या जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.

You might also like