देवदर्शनावरून परतणार्‍या कारचा भीषण अपघात, 13 भाविकांचा मृत्यू, गाडी कापून काढले मृतदेह

बंगळुरु : वृत्तसंस्था – देवदर्शन घेऊन घरी परत जाणार्‍या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव जाणार्‍या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला जोरात धडक दिली. त्यात दोन्ही कारमधील १३ जणांचा मृत्यु झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील कुनिगल टक येथे पहाटे झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीत अडकलेल्यांचे मृतदेह गाडीचे पत्रे कापून बाहेर काढावे लागले.

तामिळनाडुतील होसुरु मार्गे तेवेरा गाडीतून देवदर्शन करुन भाविक परत येत होते. कुनिगल टक येथे गाडी आली असताना समोरच्या लेनमधून एक कार भरधाव येत होती. तिच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तिने मधला दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर ती आली. त्याचवेळी समोरुन येत असलेल्या तवेराला तिने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला.

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पत्रा कापून आतील लोकांना बाहेर काढले. त्यात १३ जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.