इंदापूर : सराटी नजीक अपघातात एक ठार चार जण जखमी

इंदापूर‌ : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – रात्रीच्या वेळी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी अकलूज येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात असताना बावडा-सराटी नजिक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले असुन ही घटना मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास इंदापूर अकलूज रोडवरील मौजे सराटी नजिक घडली आहे. याबाबत ज्ञानेश्वर मल्हारी मारकड रा. मदनवाडी चौक, भिगवण यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की ३ डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मी घरी झोपलो असताना माझा भाऊ चंद्रकांत मारकड याने मला मोबाईल फोन करून सांगितले की, सचिन मोहन घोडके व तात्याबा केसु मारकड, पांडुरंग केसु मारकड, धोंडीबा लक्ष्मण देवकर, दत्ता पांडुरंग मारकड असे सर्व राहणार वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर येथून सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पुढील औषधोपचार कामी अकलूज येथील खासगी रुग्णालयात लाल रंगाच्या ब्रेजा कार क्रमांक एम. एच. 42 एस 92 22 यामधून जात असताना इंदापूर अकलूज रोड लगत सराटी येथील पेट्रोल पंप जवळ रस्त्यावरील खड्ड्यात अचानक आदळल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या व लिंबाच्या झाडावर आदळली.

गाडीचा दरवाजा आपोआप उघडल्याने रस्त्यावर आदळले, यातील माझे चुलते तात्याबा मारकड यांच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूस मार लागल्याने ते जागीच ठार झाले. चालक व तीन प्रवाशांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली आहे. ही माहिती मला फोनवर मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. सदर अपघात हा चालकाच्या निष्काळजीपणा मुळे झाला असल्याने चालक सचिन घोडके यांच्या विरुद्ध फिर्याद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.

Visit : policenama.com