पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारचा भीषण अपघात, 3 गंभीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील वॅगन आर कार पाठिमागून टेम्पोला धडकली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वॅगन आर कारची धडक एका टेम्पोला बसली. हा अपघात आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास अमृतांजन ब्रीजच्या पुढे दत्तवाडी येथे झाला. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चारजण प्रवास करत होते. अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून 1 किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप समजले नाही. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या तरुणांची ओळख पटलेली नसल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीकडे पोलीस चौकशी करत आहेत. अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/