पुण्यात मोटार पेटून भस्मसात, दोघेजण भाजले 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – शुक्रवारी पहाटे, काळेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक मोटार जळून खाक झाली. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ज्योतीबानगर येथे मोटारीला आग लागल्याची माहिती अग्निशमन केंद्रास मिळाली. त्यानुसार चिखली आणि मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब मदर तेरेसा उड्डाण पुलाशेजारी काळेवाडी येथे दाखल झाला. अग्नीशामक दलाचे भरत फाळके, रुपेश जाधव, सुनील फरांदे, गौतम इंगवले, बाळासाहेब वैद्य, लक्ष्मण व्होवाळे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर हे घटनास्थळी पोहचले.

महिंद्रा झायलो (एमएच 14, बीए 6464) या मोटारीला लागलेली आग पाणी मारून पूर्णपणे विझवली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या आगीत गणेश वायभट (२१) आणि योगेश वायभट (२३) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पोलिसांनी  वायसीएम रुग्णालयात दाखल केले. आगीत मोटार पूर्णपणे जळून खाक झाली.