स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणच्या कंपनीतील मॅनेजरला १० लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणमधील कंपनीतील एका मॅनेजरला फोर्ड कंपनीचा अधिकृत डिलर असल्याचे भासवून तब्बल १० लाखांचा गंडा  घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी डिलरविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुनील काकडे (रा. सूरजबन सोसायटी, औंध) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मयूर आनंदा सुर्वे (रा. ३०, चिंचवड) यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. ते चाकणमधील एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. दरम्यान त्यांना कार खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी ओएलएक्सच्या माध्यमातून कार खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भातील माहिती घेतली. ओएलक्सवर कार बाजार कंपनीची माहिती होती. दरम्यान औंध भागातील ब्रेमेन चौकाजवळ काकडे याने मोटार वर्ल्ड नावाने कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. भक्ती प्लाझा इमारतीत त्याचे कार्यालय होते.

तक्रारदाराने नोव्हेंबर २०११ मध्ये काकडेची भेट घेतली. तेव्हा बाजारभावापेक्षा स्वस्तात नवीन कार विकत घेऊन देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर पहिल्या टप्यात त्यांच्याकडून काकडे याने बंगळुरुतील मोटर वर्ल्ड प्रा. लि. कंपनीच्या नावाने  ४ लाख ४० हजार रुपये स्विकारले. त्यानंतर उर्वरित ६ लाखांचे कर्ज तक्रारदाराने काढले. ही रक्कम तक्रारदाराने काकडेच्या खात्यात जमा केली. मात्र त्याने कंपनीकडे १० लाख ४० हजारांची रक्कम जमा न करता अपहार केला. तक्रारदाराने त्याच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याला उडवाउडवीचे उत्तरे काकडेने दिली. दरम्यान, काकडे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यानंतर तो पसार झाल्याचे निदर्शनास आले.  त्याने कंपनीची पैसे स्विकारल्याची बनवाट पावतीदेखील दिली. काकडे याने अशा प्रकारे आणखी काहीजणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. दोडमिसे तपास करत आहेत.