मोटार चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून केली लूटमार

पोलिसनामा ऑनलाईन – प्रवासाचा बहाणा करुन चोरट्यांनी एका मोटार चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील जळगाव तालुक्यातील उमाळा येथे घडली. चालकाला मारहाण करीत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या सिडको बस स्थानकाजवळ भागवत मुळे (रा.पैठण ) हे मोटार घेऊन थांबले होते. त्यावेळी चारजण त्यांच्याजवळ आले. आम्हाला जळगावच्या उमाळा येथे जायचे असल्याचे सांगून 3500 रूपये देण्याचे ठरले. यावेळी चालक मुळे यांनी त्यांचे छायाचित्र काढून घेतले. प्रवाशांनी आगाऊ म्हणून 500 रूपये ऑनलाईन तर रोख एक हजार रूपये दिले. रात्री नऊ वाजता सिल्लोडमार्गे कार निघाल्यावर रात्री 12.30 च्या सुमारास उमाळा फाटयावर ते आले. त्यानंतर त्यांनी प्रवाशांकडे उरलेले भाडयाचे रूपये 2 हजार कारचालकाने मागितले असता प्रवाशाने मोटारीची चावी मागितली. दुसर्‍याने बॅगेतून मिरची पूड काढून ती चालकाच्या डोळ्यात फेकली. त्यानंतर चौघांनी चालकाला मारहाण केली. त्यांच्या खिशातील 5,400 रूपये काढून घेतले. 10 हजार रूपयांचा मोबाईलही हिसकावला. चालकाने आरडाओरड केल्याने परिसरातील काही जण धावून आले असता चारही प्रवाशांनी पलायन केले.