काय सांगता ! होय, पिंपरीतील कार चक्क 171 KM च्या ‘स्पीड’नं धावली ‘हाय-वे’वर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रवाशांचा प्रवास आरामदायक व विना अडथळा व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग चार पदरी करण्यात आले. त्यावरुन ताशी ९० किमी वेगाने जाण्याची मर्यादा असताना पिंपरीतील एक कार ताशी १७१ किमी वेगाने धावली आहे. कोल्हापूर-पुणे महामार्गावरील भुईजजवळ महामार्ग पोलिसांनी या कारचा हा भन्नाट वेग स्पीडगनमध्ये कैद केला आहे. गाडीच्या चालकाच्या नावाने पोलिसांनी १ हजार रुपयांचे चलनही फाडले आहे.

महामार्गावर अतिवेगाने जाण्याने अपघात होऊन त्यात अनेकांना प्राण गमवावे लागतात. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाने महामार्ग पोलिसांना अत्याधुनिक साधनाने युक्त अशा स्पीडगन असलेल्या व्हॅन देण्यात आल्या आहेत.

महामार्ग पोलिसांनी २१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही व्हॅन भुईजजवळ उभी करुन पोलीस जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा वेग स्पीडगनद्वारे मोजण्यात येत होता. त्यावेळी साताऱ्याकडून एक कार अतिवेगाने पुण्याच्या दिशेने जात होती. या कारचा वेग पाहून पोलीसही अवाक झाले. सुरुवातीला या कारचा वेग ताशी १७५ चा वेग होता. स्पीडगनच्या जवळ येताच त्या कारचा वेग ताशी १७१ किमी असा नोंदविला गेला. काळजाचा थरकाप उडवून देणारी ही कार डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत दृष्टीआड झाली. आतापर्यंत या महामार्गावर ताशी १५० किमीपर्यंत वाहने जात असल्याचे नोंदविले गेले आहे. मात्र, १७१ किमी वेगाची प्रथमच नोंद झाली आहे. त्याचबरोबर इतका प्रचंड वेग असतानाही तितक्याच गतीने ही कार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अत्याधुनिक मशीनच्या तंत्रज्ञानाचे पोलिसांना सहाय्य होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –