…म्हणून करावे लागले विकास दुबेचे एन्काउंटर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड विकास दुबेला 10 जुलै रोजी एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले. अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी दुबेला ठार केले. आता या गाडीचा अपघात कसा झाला यासंदर्भात दुबेला कानपूरला आणणार्‍या स्पेशल टास्क फोर्सने माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेश पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्सने रस्ते मार्गाने विकास दुबेला उज्जैनवरुन कानपूरला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र कानपूरजवळ आल्यावर हायवेवर दुबेला घेऊन जाणार्‍या गाडीचा अपघात झाला. लांबचा प्रवास करुन गाडीचा चालक थकला होता. त्यातच गुरांचा एक कळप अचानक रस्त्यावर गाडीसमोर आला. त्यामुळे त्यांना वाचवण्याच्या नादात गाडीचा अपघात झाला, यासंदर्भात स्पेशल टास्क फोर्सने माहिती दिली आहे.

दुबेला घेऊन जाणार्‍या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये पाच पोलीस जखमी झाले. या अपघाताचा फायदा घेऊन दुबेने रमांत पचुरी या पोलीस अधिक्षकाकडून बंदूक हिसकावून घेतली आणि तो हायवेच्या बाजूला असणार्‍या कच्च्या रस्त्याकडे पळू लागला. गाडीच्या मागून येणार्‍या दुसर्‍या गाडीमधील पोलिसांनी दुबेला घेऊन जाणारी गाडी पलटल्यानंतर तातडीने गाडीतील पोलीस कर्मचार्‍यांची मदत करण्यासाठी पलटलेल्या गाडीकडे धाव घेतली.

काही पोलीस कर्मचारी दुबेच्या मागावर गेले. पोलिस कर्मचार्‍यांना ठार करण्याच्या उद्देशाने दुबेने गोळीबार सुरु केला. दुबेला जिवंत पकडण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो गोळीबार करत असल्याने पोलिसांना त्याच्या अधिक जवळ जाता येत नव्हते, असेही स्पेशल टास्क फोर्सने म्हटले आहे.