कार्डियाक एरिथिमिया वरील उपचार देणारे अत्याधुनिक देशातील एकमेव मशीन पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कार्डियाक एरिथिमिया वर उपचार करणारे अत्याधुनिक मशीन आता पुण्यात दाखल झाले आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्डियाक एरिथिमिया वरील उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ऍडव्हान्स फिचर असणारे हे भारतातील एकमेव मशीन असल्याचे कमला नेहरू येथील मीनाक्षी पवार यांनी सांगितले आहे. नगरसेवक अजय तायडे यांच्या पुढाकाराने हे मशीन पुण्यात उपलब्ध करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले. जागतिक दर्जाची जीव वाचवणारी उपचार पद्धती परवडणाऱ्या दरात पुण्यात उपलब्ध करण्यात आली आहे.

कार्डियाक एरिथिमिया म्हणजे काय ? काय आहे हार्ट अटॅक आणि एरिथिमिया मधील फरक
हृदयाच्या स्पंदनाची अनियमितता यामध्ये हृदय प्रमाणापेक्षा जास्त जलद गतीने धडधडते त्याला एरिथिमिया असे म्हणतात. यातील काही प्रकार जीवघेणे असतात तर काही जीवन शैली विस्कळीत करतात उदाहरणार्थ अर्धांगवायू होण्याची शक्यता पाच पटीने वाढते. हार्ट अटॅक आणि एरिथिमिया हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आजार आहेत. हार्ट अटॅक मध्ये हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तर एरिथिमिय मध्ये हृदयात विद्युत शॉर्टसर्किट होते किंवा हृदयाची एखादी पेशी प्रमाणापेक्षा जास्त गतीने व अस्वाभाविकपणे ठोके वाढवते. बरेचदा तुम्हाला त्याची लक्षणे दिसून येत नाहीत परंतु तुम्ही जेव्हा नियमित आरोग्य तपासणी साठी जातात तेव्हा तुमच्या डॉक्टरांना त्याची लक्षणं आढळून येतात.

काय आहेत कार्डियाक एरिथिमियाची लक्षणे
— छातीमध्ये धडधडणे श्‍वासोच्छ्वावासाला त्रास होणे
— डोक्यामध्ये हलके वाटणे
— हृदयाचा ठोका चुकल्यासारखे वाटणे
— छातीत दुखणे
— घाम येणे

कार्डियाक एरिथिमियाची कारणे
— हृदयविकाराचा झटका
— जुन्या हृदयविकाराच्या झटक्याने जर हृदयाला जखम झाली असेल तर
— हृदयाच्या रचनेत समस्या
— हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा
— उच्च रक्तदाब थायरॉईडच्या समस्या
— धूम्रपान,मद्यपान,नशीले पदार्थाचे व्यसन
— तणाव
— मधुमेह
— अनुवंशिकता

काय आहे उपचारपद्धती
कार्डियाक एरिथिमिया वर थ्रीडी इलेक्ट्रोफिजियॉलॉजी स्टडी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ही अनेक उपचार पद्धतींपैकी प्रभावी उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीमध्ये हृदयाची चिरफाड न करता हृदयाचा त्याचा आजार समूळ नष्ट करता येतो. भारतामध्ये या आजाराचे प्रमाण खूप जास्त आहे सध्या अंदाजे तीन कोटी लोकांना हा आजार आहे. परंतु दुर्दैवाने 25000 पेक्षाही कमी लोकांना उपचार मिळत आहे. योग्य उपचार योग्य वेळी योग्य रुग्णाला मिळत नाही. पण आता यापुढे मात्र पुण्यात या आजारावरील उपचार करवून घेणे शक्य होणार आहे.

डॉक्टर राजकुमार मंत्रवादी हे कार्य इलेक्ट्रोफिजियॉलॉजिस्ट आहेत त्यांनी लंडनमध्ये पाच वर्षे अभ्यास करून पीएचडी केली आहे. त्यांनी आतापर्यंत गेल्या दहा वर्षात भारतात आणि भारताबाहेर खूप रुग्णांना या उपचारपद्धतीने बरे केले आहे. आता ते कमला नेहरू रूग्णालय येथे 3d एलेक्ट्रोफिजिओलॉजी उपचार देणार आहेत. याबरोबरच डॉक्टर हेमंत कोकणे हे देखील या अत्याधीनिक मशीनद्वारे उपचार देणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us