मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप, महागाई भडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सतत वाढत जाणाऱ्या डिझेलच्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी आजपासून (दि.१८) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशभरातील सुमारे 60 टक्के ट्रकचालक या संपात सहभागी झाले असून, पुढे काही दिवस हा संप असाच सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे.

इंधन दरवाढीच्या बाबतीत सरकारला विचारणा केली असता, सरकारचं इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्यानं इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्यसरकारने आकारलेल्या विविध करांमुळे ही दरवाढ झाल्याचं मत आॅल इंडिया कन्फेडरेशन आॅफ गुड्स व्हेईकल्स  आॅनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे. आजच्या संपात तब्बल 90 लाख ट्रकचालक उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये 3.5 लाख ट्रकचालक संपात सहभागी झाल्याचा दावा देखील बंगाल ट्रक आॅपरेटर असोशिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला आहे.

इंधन दरवाढीच्या बाबतीत विचार केला तर एक लिटर इंधनामागे केंद्र सरकारकडून 8 रुपये अधिभार आकारला जातो. तर एक किमी रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. याशिवाय थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्यामुळे मालवाहतूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.यामुळे संप पुकरला असलल्याचे मालवाहतूकदारांनी म्हटलं आहे.   जर आणखी काही दिवस मालवाहतूकदारांचा संप सुरू राहिला तर त्याचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा भडका देखील उडू शकतो.