अलिशान गाडी अन् मालकाच्या पत्नीला देखील पळवलं, चावी गाडीतच सोडून गेल्याचा बसला फटका

चंदीगढ : वृत्तसंस्था – (Chandigarh) दोघा चोरट्यांनी एका व्यक्तीची गाडी चोरली. पण इथेच ही घटना मर्यादीत नाही, तर या बदमाश चोरांनी टाटा टियागो गाडीच्या आत थांबलेल्या गाडीच्या मालकाच्या पत्नीसमवेत पळ काढला आहे. पंजाबमधील डेरा बस्सी शाळेसमोर गुरुवारी (दि. 7) ही  येथे विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे.

राजीव चांद आणि त्यांची पत्नी रितू हे दोघे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शाळेमध्ये आपल्या मुलांची शाळेची फी भरण्यासाठी आले  होते. चांद यांनी शाळेसमोर गाडी पार्क केली होती. ते गाडीलाच चावी लावून आतमध्ये शाळेत फी भरण्यासाठी गेले होते. तर त्यांची पत्नी रितू या गाडीमध्येच त्यांची वाट पाहत थांबल्या होत्या. तेंव्हा दोघा चोरांनी गाडीचा दरवाजा उघडून त्यात बसून पोबारा केला.दोघा चोरापैकी एकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसला तर दुसरा रितू यांच्याजवळ बसला. त्याने रितू यांचे तोंड जबरदस्ती बंद केले.

रितू यांचे तोंड दाबून त्याच परिस्थितीत गाडी चोरून पोबारा केल्यानंतर साधारण पाच किलोमीटरनंतर त्यांनी गाडी थांबवली. अंबाला टोल नाक्याजवळ त्यांनी रितू यांना खाली उतरवले आणि ते डेरा बस्सीच्या दिशेने फरार झाले. त्यानंतर रितू यांनी आपल्या पतीला तातडीने फोन करुन घडलेली हकिकत सांगितली. दरम्यान अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, टोल नाक्याजवळच्या सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून या चोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.