२ प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विमानतळावर पहाटे दोन वेगवेगळ्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

याबाबत विमानतळ पोलिसांनी सांगितले की,  हा प्रकार पहाटे पावणे पाच वाजता लक्षात आला. ५८ वर्षांचे पाटील नावाचे प्रवासी पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाने बंगलोरला जात होते. त्यांच्याकडील सामानाची विमानतळावरील कर्मचारी तपासणी करत असताना त्यांच्या बॅगेत २२ काडतुसे आढळून आली. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी पाटील यांना थांबवून ठेवून सामानासह विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असून नजर चुकीने सामानात हे २२ काडतुसे आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह (वय ६०) हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान २ काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. भगवान चरणसिंह हे रेल्वेत एक्सप्रेसचे चालक आहेत. त्यांचा मुलगा वाघोली येथील आयटी पार्कमध्ये नोकरीला आहे. त्यांच्या सामानात काडतुसे आढळल्याने ते एकदम घाबरुन गेले असून ही काडतुसे कशी आली हे त्यांना सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसभेच्या १०० जागांसाठी सवर्ण आरक्षण विधेयक