Pune News : सोरतापवाडीमधील तरुणाकडून गावठी पिस्टलसह काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परप्रांतिय तरुणाकडून गावठी पिस्टलसह काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे शनिवारी (दि.23) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घटनवट यांनी दिली. आरोपीकडून 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महमद अलीहुसेन खान (वय-19 रा.सोरतापवाडी, ता.हवेली जि.पुणे. मूळ रा. पुरेखुदावन्द, रस्तामऊ, पोस्ट मंगरौली, जि.अमेटी, राज्य-उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पुणे-सोलापूर रोडवरील सोरतापवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या परिसरात काळे रंगाचा टी शर्ट व निळी जीन पॅट घातलेला एक इसम कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून महमद अलीहुसेन खान याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस, मोबाइल असा एकुण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपी महमद खान याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.