संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांच्यावरील गुन्ह्याचा तपास ‘अंतिम’च्या टप्प्यात, पुणे ग्रामीण पोलिसांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मिलींद एकबोटे यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या गुन्ह्याचा तपास शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरेगाव भीमा येथे प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील कोरेगाव भीमा प्रकरणाबाबतची माहिती दिली. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे उपस्थित होते. संदीप पाटील म्हणाले, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल गुन्ह्याची चार्जशिट सरकारची मंजुरी आल्यानंतर दाखल करण्यात येणार आहे. कोरेगाव हिंचारप्रकरणी एकूण तीस गुन्हे ग्रामीण पोलिसांकडे दाखल झाले आहेत. त्यातील चौदा गुन्ह्यांची चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. तर सोळा गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु आहे.

भिडे आणि एकबोटे यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारकडे चार्जशिट दाखल करण्याबाबत परवानगी मागण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, 1 जानेवारी 2020 रोजी कोरेगाव भीमा येथे मोठा जनसमुदाय विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/