ढोकेश्वर क्रेडीट सोसायटीच्या संचालकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची १९ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धनकवडी येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम कदम (वय ६६) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम कदम हे मुंबई येथील एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी ढोकेश्वर सोसायटीची धनकवडीतील बालाजीनगर भागात असणाऱ्या शाखेत ठेव ठेवली होती. या ठेवीवर ढोकेश्वर सोसायटीने १३ टक्के व्याजदाने परतावा देण्यात येईल असे आमिष कदम यांना दाखवले. कदम यांनी सोसायटीच्या मासिक निवृत्ती वेतन योजनेत २०१७ मध्ये साडेसहा लाख रुपये गुंतवले होते.

कदम यांच्यासह मधुकरराव खोपडे आणि उत्तम चौधरी यांनी देखील सोसायटीत ठेवी ठेवल्या होत्या. कदम, खोपडे आणि चौधरी यांना ठेवींवर जादा परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर सहकार पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी), फसवणूक या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शीतल सुतार तपास करत आहेत.