शेतकऱ्याकडे मागितली 20 हजारांची लाच ! लिपिकाविरोधात FIR

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन –   शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या एका लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 50 दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील ही घटना असून पोलीस उप अधीक्षक कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी आणि तांत्रिक विश्लेषण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जमीन हद्द निश्चित करताना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यासाठी सदर लाचेची मागणी करण्यात आली होती.

सुरेश रमाकांत कदम (वय 34, रा. वायरलेस फाटा, गिरीम, ता दौंड) असं गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचं नाव आहे. दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. दौंड शहरातील पोलीस उप अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दौंड आणि शिरूर तालुक्यांचा समावेश आहे.

नेमंक प्रकरण काय?

शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील एका शेतकऱ्याला त्याच्या वडिलोपार्जित जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त हवा होता. यासाठी शेतकऱ्यानं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात 31 ऑक्टोबर 2020 रोजी अर्ज केला. हा अर्ज दौंड उप अधीक्षक कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी आला. यानंतर येथील लिपिक सुरेश कदम यानं पोलीस बंदोबस्त मंजुरीसाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. कदम यानं शेतकऱ्याचा मित्र विक्रम शितोळे याच्याकडे यासाठी निरोप दिला.

संबंधित शेतकऱ्यानं पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 18 डिसेंबर रोजी उप अधीक्षक कार्यालय आणि परिसरात सापळा रचण्यात आला. लिपिक कदमनं तडजोड करत 20 ऐवजी 15 हजार रुपये घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तास मंजुरी देण्याचं कबुल केलं. लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दौंड पोलीस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक शरद गोर्डे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.