१० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

येवला (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाइन – अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येवला तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नागरे याने १० हजार रुपयांची लाच मागून ८ हजार रुपये स्विकारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी त्याच्यावर येवला शहर पोलीस ठाण्यात आज (गुरुवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या वाहनाचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अपघातग्रस्त वाहन जप्त करण्यात आले होते. जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी गणेश नागरे याने दहा हजार रुपायांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

पथकाने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचून पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी गणेश नागरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची ठरलेली रक्कम स्विकारण्याचा प्रयत्न केला. गणेश नागरे याच्याविरुद्ध आज (गुरुवार) येवला शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.