एसटीत दारूड्याचा राडा, मुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांना शिव्यांची लाखोली

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – एका दारूड्या प्रवाशाने एसटीबस मध्ये जोरदार राडा केला. अखेर ही बस पोलीस ठाण्यात नेल्यानंतर तिथे चार-पाच तास खोळंबा झाल्यानंत मार्गस्थ झाली. दारुच्या नशेत असलेल्या या प्रवाशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शिवीगाळ केली. तसेच चालक, वाहक आणि प्रवाशांनाही शिवीगाळ केली. या व्यक्तीचे नाव बन्सी डोके असून तो मुंबईतील रहिवाशी आहे. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्व प्रवासी आणि एसटी बस सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच होती. त्यामुळे मुंबईला जाणारे प्रवासी ताटकळले होते.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड आगाराची कराड – मुंबई (एमएच १५ – बीटी ४७८१) ही एसटी बस दुपारी कराड बस स्थानकातून मुंबईकडे जाण्यासाठी सुटली. यावेळी बन्सी डोके (४८, रा घणसोली, मुंबई) हा प्रवासी दारुच्या नशेतच एसटी बसमध्ये बसला. गाडीत पन्नासहून अधिक प्रवासी होते. गाडी सुरु झाल्यानंतर बन्सीने मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री रावते यांना जोराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला याकडे वाहकासह प्रवाशांनीही दुर्लक्ष केले. मात्र, यानंतर त्याने प्रवाशांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांना त्याने धक्काबुक्कीही केली. चालकालाही त्याने शिवीगाळ केली. त्यास शिव्या देण्याचे कारण विचारले असता तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. याचवेळी त्याने एका समाजाच्या संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले.
त्याचे हे त्रास देण्याचे प्रमाणा वाढल्यानंतर वाहक व चालकाने एसटी बस थेट सातारा पोलीस ठाण्यात आणली. तेथे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या सर्व गदारोळात दुपारच्या सुमारास पोलीस ठाण्यात आलेली एसटी बस पुन्हा मार्गस्थ होण्यास सायंकाळ झाली. सुमारे चार ते पाच तास सर्व प्रवाशांचा खोळंबा झाला. शिवाय या दारूड्याने कारण नसताना राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनाही शिवीगाळ केली.