10 लाखाची मागणी करून 1 लाखाची लाच घेणार्‍या एपीआयविरूध्द गुन्हा

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – सराफी व्यावसायिकाकडे 10 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्‍ता म्हणून एक लाख रूपयाची लाच खासगी व्यक्‍तीमार्फत मागणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह इतर दोघांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघांविरूध्द डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल भाऊराव वाघ (34, नेमणुक : डोंबिवली पोलिस स्टेशन), खासगी व्यक्‍ती महेश रतन पाटील (रा. देसाई डायघर वेताळपाडा, पोस्ट – पडले, ता.जि. ठाणे) आणि प्रकाश रामलाल दर्जा (36, रा. शिवाली दर्शन बिल्डिंग, नेरूळकर रोड, संगितावाडी, डोंबिवली पूर्व) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रथमेश ज्वेलर्सचे मालक कोठारी यांच्याविरूध्द दाखल गुन्हयात तक्रारदार यांना न अडकविण्यासाठी व तक्रारदार यांच्या गोल्ड ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमस्ता लायसन्स, रूमचे अ‍ॅग्रीमेंट आणि इतर कागदपत्रे परत करण्यासाठी सहाय्यक निरीक्षक वाघ यांनी महेश पाटील यांना प्रोत्साहित करून तक्रारदाराकडे 10 लाखाच्या लाचेची मागणी केली. लाचेचा पहिला हप्‍ता म्हणून एक लाख रूपये स्विकारण्याचे मान्य करून सहाय्यक निरीक्षक वाघ यांनी प्रकाश दर्जा यांच्याकरवी लाच स्विकारली. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालु होती. लाच स्विकारणार्‍या प्रकाश दर्जाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तात्काळ अटक केली आहे. तक्रारदार यांनी दि. 3 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणी संदर्भात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पथकाने तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचुन प्रकाश दर्जा यांना सरकारी पंचासमक्ष एक लाखाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

Loading...
You might also like