भाजपा आ. पडळकर यांच्याविरुद्ध बारामतीत FIR दाखल, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. याप्रकरणी पडळकर यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आला.

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असे अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राज्याच्या राजकारणात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व तालुका अध्यक्षांनी बारामती शहर पोलिसांना याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत बारामती शहर पोलिसांनी आज पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद नोंदवली असून पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले आहे. भादवि कलम 505(2) अन्वये पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र पडसाद

पडळकर यांनी पवारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतप्त पडसाद उमटत होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी बारामती पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्य आंदोलन केले आणि तक्रार दाखल करण्यास सांगितले. जोपर्यंत पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका घेतली.

अखेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी नगराध्यक्ष पोर्णीमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक अध्यक्ष अमर धुमाळ, महिला अध्यक्ष वनिता बनकर व अनिता गायकवाड, बाळासाहेब तावरे, मदन देवकाते, नवनाथ बल्लाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप व सुभाष सोमाणी हे उपस्थित होते.

पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भारत सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला असून अशा सन्मान्य व्यक्तीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती.