Pimpri : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण ! आ. बनसोडेंच्या मुलासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणार्‍या तानाजी पवार याचे बनसोडे यांच्या लोकांनी अपहरण करुन जबरदस्तीने त्यांच्या कार्यालयात आणले होते. अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यानेच पवार याच्यावर चॉपरने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गोळीबाराच्या या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

तानाजी पवार याच्या फिर्यादीवरुन पिंपरी पोलिसांनी सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान व त्यांचे इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, ३६४, ३०७, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, शस्त्र अधिनियम १९५९ चे काम ४ (२५), महाराष्ट्र कोविड उपाय योजना अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा तानाजी भगवान पवार (३९, रा. ओम क्लासिक सोसायटी, संतनगर, मोशी प्राधिकरण) याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तरी आमदार बनसोडे यांना कोठेही गोळी लागली नाही. त्यांच्या कार्यालय परिसरात पिस्तुलाच्या गोळीच्या दोन पुंगळ्या आढळून आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तानाजी पवार याला ताब्यात घेतल्यावर वेगळीच माहिती पुढे आली.

तानाजी पवार याने याबाबत पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तानाजी पवार हा सीआरपीएफचा निवृत्त जवान असून सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका कंत्राटदाराकडे नोकरीला आहे. तानाजी पवार याला ११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांचे पी. ए. याच्या फोनवरुन संभाषण झाले. यावेळी तो आमदार अण्णा बनसोडे यांना उलटे बोलले असे समजून १२ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या आकुर्डी येथील हेगडेवार भवन येथील कार्यालयातून अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे व त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने तानाजीचे अपहरण केले.

त्यांना चिंचवडमधील काळभोरनगर येथील क्रेडॉक फिन्टेक प्रा. लिमिटेड येथील बनसोडे यांच्या कार्यालयात आणले. तेथे सावंतकुमार, लांडगे, सोन्या साजिद सुलतान यांनी व त्यांचे इतर १० ते १५ जणांनी पवार यांना हाताने, लाथाबुक्क्यांने, चामडी पटट्याने, लोखंडी रॉड, लाकडे दांडके यांनी मारहाण केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तानाजी पवार याच्या फिर्यादीनुसार पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.