जेजुरी गडावर गोंधळ घातल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर FIR

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे.

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच आज पहाटे या पुतळ्याचे अनावरण करुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप पडळकरांनी केले.

जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. यासाठी सगळी तयारी झाली होती. मात्र, आज पहाटे अचानक भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कर्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी पडळकर यांना पुतळ्याचे अनावरण करताना रोखले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली.