पंढरपूरमधील भाजप नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी 22 शिवसैनिकांवर FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील एका आंदोलनदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषण करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासून शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्याप्रकरणी रविवारी (दि.७) रात्री उशिरा २० ते २२ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (५) वीज दरवाढीविरुद्ध भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानाची व्हिडीओ क्लिप शनिवारी ६ जानेवारी रोजी समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन शिवसैनिकांनी शनिवारी शिरीष कटेकर यांच्या अंगावर शाई टाकून, तोंडाला काळे फासून, हिरव्या रंगाची बांगड्याची माळ गळ्यात टाकून निळ्या रंगाची साडी डोक्यावर टाकली.

त्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. सदरील घटनेची भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांनी दखल घेऊन मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे, संदीप केंदळे, जयवंत माने यांच्यासोबत अन्य २० ते २२ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. अधिकचा तपास शहर पोलीस निरीक्षण अरुण पवार करत आहेत.