‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या ग्रामस्थांवर FIR दाखल

0
15
Pune Crime News Ransom cheating case filed against Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad Nanasaheb Shankarrao Gaikwad and Deepak Nivratti Gaware
file photo

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या बोडणी येथे कोरोना जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या 32 ते 34 ग्रामस्थांवर मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार होती.

बोडणी येथे करोनाचे 72 रुग्ण आढळूनही ग्रामस्थ यंत्रणेला सहकार्य करत नाहीत, नियम पाळत नाहीत म्हणून तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी हे ग्रामस्थांना समजावण्यासाठी गेले असता ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते. ग्रामस्थांनी कोणतीच सहकार्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे अधिकार्‍यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.

या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल केला असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपकाही ग्रामस्थांवर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.