Pune : 25 लाखाच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर FIR

शिक्रापूर : ऑनलाइन टीम – दुर्मिळ असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणे कायद्याने गुन्हा असताना देखील अनेक ठिकाणी मांडुळाची तस्करी केली जात आहे. शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा जवळ असणाऱ्या वडगाव परिसरात मांडुळाची तस्करी करणाऱ्यांकडून 25 लाख रुपये किंमतीचे मांडुळ जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद अजितराव साळुंके (वय-24 रा. कोरेगाव भीमा) व सागर गजानन जाधव (वय-22 रा. शिरुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बापू भास्कर हाडगळे (रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथे दोन युवकांनी मांडूळ जातीचा साप पकडून ठेवला असून त्याची तस्करी करणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वडगाव परिसरात सापळा रचला. त्यावेळी दोघेजण दुचाकीवरुन जाताना आढळून आले. त्यांच्याजवळ निळ्या रंगाचा बॉक्स होता. त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॉक्सची पाहणी केली असता बॉक्समध्ये माती आढळून आली. माती खाली त्यांनी मांडूळ जातीचा साप लपवून ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्याकडील 25 लाख रुपये किंमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त केला आहे. तसेच दुचीकी व दोन मोबाईल फोन जप्त केले. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहेत.