50 हजाराच्या लाच प्रकरणी पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल गुन्हयात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी तसेच गुन्हयात मदत करण्यासाठी 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणारा माढा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. त्याच्याविरूध्द लाच मागितल्याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक निलेश तानाजी बल्लाळ (32, बक्कल नंबर 1620, नेमणुक ः माढा पोलिस स्टेशन) असे अॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदाराच्या ड्रायव्हरविरूध्द मोढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्हयात पोलिसांनी ट्रक जप्त केलेला आहे. तो ट्रक सोडून देण्यासाठी आणि आगामी काळात गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिस कर्मचारी निलेश बल्लाळ यांनी तक्रारदाराकडे 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार रूपयाची लाच देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागात संपर्क साधुन तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पोलिस कर्मचारी निलेश बल्लाळ यांनी दि. 20 फेबु्रवारी ते दि. 6 मार्च दरम्यान तक्रारदाराकडे 50 हजार रूपयाची लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले. गुन्हयाचा पोलिस तपास पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे करीत आहेत.