पोलिसात तक्रार दिली म्हणून महिलेस मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या
विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेस मारहाण करण्यात आली. हा प्रकार बुधवारी (दि. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास भारतनगर पिंपरी येथे घडला. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सचिन संजू गायकवाड (30), श्रीकांत शिवाजी गोडबोले (25), अरमान शेख (24, सर्व रा. भारतनगर पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेवर दबाव आणला. ‘केस मागे घे नाहीतर तुझे जगणे मुश्किल करून टाकू’ अशी धमकी देत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत महिलेने बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी महिलेला पुन्हा एकदा शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पुन्हा पोलिसात धाव घेत गुन्हा नोंद केला आहे. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com